मुंबई
“आपल्याला सत्ता स्थापनेची आणि पदे मिळविण्याची घाई नाही, घाई केली तर आपले नुकसान आहे. आपली मागणी एवढीच आहे की जे कबूल केले आहे त्यापेक्षा जास्त नको आणि त्यापेक्षा कमी नको,” ही भूमिका मांडली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी. आपल्या नेत्याला खोटे पाडणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे झुकण्याची गरज नाही, असे मत पक्षाच्या आमदारांनी मांडले. त्यामुळे शिवसेना सहजासहजी भाजप सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत भाजपा येत्या रविवारी किंवा मंगळवारी राजभवन येथे छोटेखानी समारंभात मंत्रिमंडळ शपथविधी कार्यक्रम उरकून घेण्याची शक्यता आहे.
भाजप आणि सेनेत प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद या जाहीरपणे दिलेल्या आश्वासनाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी कानावर हात ठेवून असे काही ठरले नसल्याचे सांगितल्याने शिवसैनिक आणि आमदार यांच्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शिवसेना भवन येथे पार पडलेल्या बैठकीत आमदारांनी संतप्त प्रतिक्रया व्यक्त करतांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना खोटे ठरवणाऱ्या फडणवीस यांच्यासोबत जाण्याची गरज नाही, असे मत व्यक्त केले.
ठाकरे यांनीही सांगितले की त्यांच्यावर प्रबोधनकार ठाकरे यांचे संस्कार आहेत. “मी खोटे बोलत नाही, दिलेला शब्द पाळतो. त्यांनीही दिलेला शब्द पाळावा. त्यांनी जे कबूल केले होते, त्यापेक्षा काकणभरही जास्त नको आणि त्यापेक्षा कमीही नको. पदे मिळविण्याची तुम्हाला कसली घाई आहे? घाई केल्यास आपले नुकसान होईल. केवळ भाजपच नाही तर सगळे पक्ष माझ्या संपर्कात आहेत,” असे ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले.
यातून सेना आणि भाजपातील संबंध किती ताणले गेले आहेत, हे स्पष्ट होत आहे.
भाजपची उपमुख्यमंत्री पदासह 18 मंत्रिपदाचा प्रस्ताव
दरम्यान, सेनेला मुख्यमंत्री पद देणार नाही. उपमुख्यमंत्री पदासह 18 मंत्रिपद देण्याची तयारी भाजपने ठेवली आहे. तसे फिलर्स सेनेकडे पाठविण्यात आले आहेत. हा प्रस्ताव सेनेला मान्य नाही. हा प्रस्ताव स्वीकारायचा झाल्यास सेनेला गृह खात्यासह नगर विकास आणि महसूल खाती हवी आहेत. ही खाती सोडण्यास भाजप तयार नाही.
काय होऊ शकेल?
सेना अडमुठी भूमीका सोडण्यास तयार नसेल तर भाजपा 3 किंवा 5 नोव्हेंबर रोजी राजभवन येथे केवळ भाजप सरकारचा शपथविधी उरकून घेऊ शकेल. अल्पमतातील भाजप सरकारला डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन दरम्यान सभागृहात बहुमत सिध्द करावे लागेल. तोपर्यंत सेना सत्तेत सहभागी झाल्यास भाजप सरकार तरून जाईल. अन्यथा भाजपला विरोधी पक्षाची मदत घ्यावी लागेल.
राष्ट्रवादी काय भूमिका घेईल?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीवादी कॉंग्रेस नेतृत्वाने शिवसेनेसोबत जाऊ नये आणि भाजपवर सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास सभागृह त्याग करावा किंवा अनुपस्थित रहावे, असा निरोप भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. त्या मोबदल्यात प्रफुल्ल पटेल यांना सक्तवसुली संचालनालयच्या चौकशीतून सही सलामत बाहेर काढू, असे आश्वासन दिल्याचे समजते.
याच मुद्दयावर शिवसेनाही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन करू शकेल, असा दावा सेनेतील सूत्राने व्यक्त केला. राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी काही काळ ईडी चा मुद्दा बाजूला सारून विरोधी पक्षांना सोबत घेता येईल असे हा नेता म्हणाला.