सेनेच्या मंत्र्यांशी भाजपची चर्चा
उद्धव ठाकरे यांनी वेळ दिल्यास गडकरी मुंबईत दाखल होणार
मुंबई
महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्याबाबत निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगावर तोडगा निघण्याची अंधुक आशा आज निर्माण झाली आहे. भाजपच्या दोन वरिष्ठ मंत्र्यांनी शिवसेनेच्या तीन मंत्र्यांशी चर्चा केली आहे. या सेना मंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या वेळ मिळवून द्यावी म्हणजे किमान चर्चेची कोंडी फुटेल, असे भाजप मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या सकाळी नागपूर येथून मुंबईत दाखल होतील.
आज काय घडले?
# भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चेची कोंडी फोडण्यासाठी सेना मंत्र्यांना फोन केले.
# सेनेचे ज्येष्ठ नेते आणि मावळते मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे यांच्याशी सुधीर मुनगंटीवार यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला.
# उद्धव ठाकरे यांची उद्या वेळ मागण्यात आली आहे. सेना मंत्री त्यासाठी प्रयत्न करतील.
# ठाकरे यांची वेळ मिळाल्यास गडकरी मुंबईत दाखल होतील.
# गडकरी, पाटील आणि मुनगंटीवार हे ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा करतील.
# ठाकरे यांच्या मागण्या पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यपर्यंत पोहोचवतील.
# भाजप-सेना सरकार स्थापन होण्याची शक्यता असल्यास ती गृहीत धरून आणि विद्यमान सरकारची मुदत शनिवारी संपत असली तरी राज्यपाल त्यांचा अधिकार वापरून सरकार स्थापणेसाठी १५ दिवसाची मुदत देऊ शकतील.
# तत्पूर्वी, फडणवीस सरकार राजीनामा देईल आणि राज्यपाल केवळ फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मान्यता देतील.
दरम्यान, अडीच वर्षे मुख्यमंत्री पद या सेनेच्या मागणीबाबत शहा हेच निर्णय घेणार असल्याने भाजप शिष्टमंडळ केवळ चर्चेची कोंडी फुटावी आणि सेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी भाजपने हा पुढाकार घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.