भाजप सरकार स्थापन करून सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची परीक्षा देणार का?
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी-शिवसेना अन्य घटक पक्षाचे महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजभवन येथे बोलतांना व्यक्त केला. पण, “आता माघार नाही” असा निर्धार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्याने सरकार स्थापन करण्याचा तिढा सुटण्याची चिन्हे नाहीत. अशा वेळी, देवेंद्र फडणवीस अल्पमतातील सरकार स्थापन करून विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या परीक्षेला सामोरे जातील का हा खरा प्रश्न आहे.
पक्षाच्या आमदारांना संबोधित करताना ठाकरे यांनी आता माघार नाही अशा स्पष्ट शब्दात निर्धार व्यक्त केल्याने सेना मुख्यमंत्री पद घेतल्याशिवाय भाजप सरकारमध्ये सहभागी होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
भाजपचे पाटील आणि सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांची भेट घेतली आणि त्यांना राज्यातील राजकीय पेचप्रसंगाबाबत माहिती अवगत केली.
यानंतर पत्रकारांशी बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी सरकार स्थापण करण्यास नेहमीपेक्षा उशीर होत असला तरी महायुतीचेच सरकार स्थापन होईल, असा दावा केला.
सेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आणि मावळत्या सरकारची मुदत ९ नोव्हेंबर रोज संपत असल्याने त्याआधी नवीन सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. अशा वेळी फडणवीस हे अल्पमतातील सरकार स्थापन करून सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची हिंमत दाखवतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आपले आमदार भाजपकडून फोडले जातील या भीतीने शिवसेनेने सर्व आमदारांना बांद्रा येथील रंगशारदा येथे मुक्कामाला पाठवले असून शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुख यांना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी तैनात केले आहे. अशा वेळी भाजपला इच्छा असली तरी सेनेचे आमदार फोडणे अवघड होणार आहे.
दरम्यान, इतिहासात डोकावले तर यापूर्वी भाजपचे दिवंगत नेते आणि तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे त्यांचे अल्पमतातील सरकार पडणार हे माहीत असतांनाही १७ एप्रिल १९९९ रोजी लोकसभेत बहुमत परीक्षेला सामोरे गेले होते. घोडेबाजाराचे आपण समर्थन करत नाही आणि केवळ सरकार स्थान करण्यासाठी हा पर्याय नाकारला अशा शब्दात भूमिका मांडून वाजपेयी यांनी सरकारचा राजीनामा दिला होता. हीच धमक फडणवीस किंवा नव्याने स्थापन होणारे भाजप सरकार दाखवेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


