मुंबई
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे।प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मावळते वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार दुपारी 2 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
आज काय होऊ शकेल?
खालीलप्रमाणे या पाच शक्यता गृहीत धरता येतील
१.राज्य विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकून भाजप सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे. भाजप आज राज्यपाल यांच्याकडे सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकेल आणि सभागृहात बहुमत सिद्ध करू, असे सांगू शकेल.
भाजपने १५ अपक्ष व अन्य पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. १४५ ही बहुमताची संख्या गाठण्यासाठी भाजपला अजून २५ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.
२. बहुमत नसल्याने भाजप सरकार स्थापन करू शकत नाही, असे पाटील आणि मुनगंटीवार हे राज्यपाल यांना सांगू शकतील. अशा वेळी राज्यपाल हे नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार अन्य पक्ष सरकार स्थापन करू शकेल का याची चाचपनी करतील आणि शिवसेनेकडे विचारणा करू शकतील.
३. भाजप स्वबळावर अल्पमतातील सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केल्यास शिवसेना त्यांचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांना राजीनामा देण्यास सांगून केंद्रातील मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारमधून बाहेर पडतील.
४. केंदीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या चर्चेचा सूर सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावेल.
५. संघाने गडकरी यांना राज्यात पाठवण्याचा निर्णय घेतला तर सेनेचा विरोधाचा सूर मावळू शकेल आणि भाजपचे गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-सेना सरकार सत्तेवर येऊ शकेल.
अर्थात या पाच शक्यता गृहीत धरल्या असल्या तरी पडद्यामागे घडणाऱ्या असंख्य घटना सरकार स्थापनेत भूमिका बजावत आहेत. या घटनांचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे.