..आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील फोटोग्राफर जागा झाला

नागपूर: राजकारणात अपघाताने आलेले आणि विधानसभा (assembly) किंवा विधानपरिषद (Council) यापैकी कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही अपघाताने मुख्यमंत्री (CM) झालेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शासकीय-प्रशासकीय कामात व्यस्त झालेले असतानाही त्यांच्यातील फोटोग्राफर (photographer) अजूनही सजग असल्याची घटना शुक्रवारी नागपूरात (Nagpur) घडली.


नागपूर येथे एक आठवडा सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप आज शनिवारी झाला. अधिवेशन असल्याने रोज सकाळी अधिकाऱ्याकडून विविध विषयांची माहिती (briefing) घेणे, सभागृहात काय बोलायचे आहे, त्याचे टिपण घेणे अशा शासकीय आणि प्रशासकीय कामात उद्धव ठाकरे व्यस्त होते. स्वतःसाठी वेळ काढणे जिथे शक्य नाही, तिथे स्वतःच्या आवडी-निवडी आणि छंद जपणे शक्यच नव्हते. 


पण,एक घटना घडली आणि उद्धव यांची मूळ आवड एकदम जागी झाल्याचे अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आले आणि त्यांनाही सुखद धक्का बसला.


झाले असे की शुक्रवारी ठाकरे यांनी विधानभवनात (Vidhan Bhavan) वर्धा (Wardha) जिल्ह्याचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी, आमदार उपस्थित होते. शासकीय बैठकीला माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी, फोटोग्राफर उपस्थित असतात.


बैठक सुमारे अर्धा तास चालली. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बैठक संपली आणि मुख्यमंत्री ठाकरे बाहेर आले. आल्यावर त्यांचे लक्ष शासकीय फोटोग्राफर (photographer) प्रकाश कांबळी आणि उपसंपादक निशिकांत तोडकर यांच्याकडे गेले. ठाकरे यांनी कांबळे यांना जवळ बोलावून घेतले आणि कॅमेरा आणि त्याच्या तांत्रिक बाबीबद्दल आस्थेने चौकशी करायला लागले. लेन्स ची क्षमता काय, शटर स्पीड आणि बरेच काही. ठाकरे जी काही माहिती विचारत होते ते बघून कांबळे यांनाही आश्चर्य वाटले असेल. 
मुख्यमंत्री हे कांबळे यांच्याशी जवळपास 15 मिनिट चर्चा करत होते. त्यांच्यातील मूळ फोटोग्राफर जागा झाला होता आणि ते कांबळे यांना फोटो कसे काढावेत म्हणजे अधिक चांगले येतील याचे धडे देत होते. 


या चर्चेतून मुख्यमंत्री ठाकरे यांना एक गोष्ट समजली की माहिती व जनसंपर्क विभागाकडे outdated कॅमेरा आहेत आणि ते बदलण्याची गरज आहे. तुम्ही इतके जुने कॅमेरा कसे वापरता? हा ठाकरे यांचा प्रश्न बरेच काही सांगून जाणारा होता.


ठाकरे यांच्या या टिपणीवर माहिती व जनसंपर्क विभागाची नंतर बैठक झाली आणि सुरवातीला किमान मुंबई मुख्यालयासाठी किमान चार कॅमेरा विकत घेण्याचा निर्णय झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply