महसुल अधिकाऱ्याने घातला ५०० कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात?

मंत्रालयात मजला निर्जंतुकीकरण करताना कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थिती बंधनकारक

मुंबई
मंत्रालयात (Mantralaya) गेल्या आठ दिवसात तीन कर्मचारी कोरोनाचे (coronavirus)बळी ठरल्याने खडबडून जागे झालेल्या मंत्रालयीन प्रशासनाने संबंधित विभाग ज्या मजल्यावर आहे, तो संपूर्ण मजला दिवसभर बंद ठेवून निर्जंतुकीकरण (sanitize) करण्याचा निर्णय घेतला. यात कामगार (labour) आणि आदिवासी (tribal) विभाग एक दिवस संपूर्ण बंद ठेवण्यात आले. परंतु, विभागाच्या सचिवाकडे आपण किती कामसू आहोत, हे दाखवण्याचा नादात महसूल (revenue) विभागाच्या एका उपसचिवाने अवघ्या दोन तासात निर्जंतुकीकरण पूर्ण होईल, कर्मचाऱ्यांनी पूर्ण दिवस घरी राहण्याची गरज नाही, अशा सूचना काढून सर्व कर्मचाऱ्यांना आज कामावर बोलवले आहे. निर्जंतुकीकरण आणि फवारणी करतांना जे रसायन वापरले जाते त्याचा वास अत्यंत तीव्र असतो आणि तो मानवी शरीराला अपायकारक ठरू शकतो, असे असतांना या अधिकाऱ्याने सुमारे ५०० कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला आहे.


मंत्रालयात कोरोना विषाणूने कधीच शिरकाव केला आहे. असे असले तरी सर्वच विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्य पार पाडण्यासाठी नियमितपणे मंत्रालयात हजेरी लावत आहेत. मंत्री आणि त्यांचे कर्मचारीही नियमित उपस्थित राहून बैठक घेत आहेत.
मात्र, गेल्या आठ दिवसात तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यातील एक व्यक्ती एका मंत्री कार्यालयाशी संबंधित होती तर दुसरी विधानभवनाशी संबंधित होती . तिसरी व्यक्ती ही सफाई कामगार होती आणि त्याचा वावर पहिल्या मजल्यावरील कामगार आणि आदिवासी विभागाशी आल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले.

खबरदारीचा उपाय म्हणून दि ८ जुलै रोजी कामगार विभाग पूर्णपणे बंद ठेवून आठ तासाचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले. ज्या दालनाचे किंवा विभागाचे निर्जंतुकीकरण करायचे असते त्यात केवळ टेबल खुर्चीच नाही तर सगळ्या फाइल, कपाट आणि प्रत्येक कोपऱ्यात फवारणी केली जाते. यासाठी आठ तास दिले जातात आणि या कालावधीत कोणालाही या विभागात प्रवेश दिला जात नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

असे करण्याचा एकच उद्देश असतो की संपूर्ण विभागातून कोरोना विषाणूचा नायनाट व्हावा. या आठ तासात कोणीही संशयित बाधित व्यक्ती त्या निर्जंतुकीकरण केलेल्या विभागात प्रवेश करू नये, अन्यथा विषाणूचे त्या विभागातील अस्तित्व संपवण्याचे, नष्ट करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतील. या रसायनयुक्त फवारणीचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होऊ नये, हा देखील उद्देश असतो असे या अधिकाऱ्याने सांगितले.

याच अनुषंगाने दि ८ रोजी कामगार विभाग आणि दि ९ रोजी आदिवासी विभाग पूर्ण दिवस बंद ठेवून फवारणी करण्यात आली. आज दि १० रोजी महसूल विभागात फवारणी केली जाईल असे आदेश काढण्यात आले. परंतु, महसूल विभागाच्या ज्या अधिकाऱ्याच्या सहीने हे पत्रक जारी केले आहे, त्याने नमूद केले आहे की, अवघ्या दोन तासात फवारणी केली जाईल आणि म्हणून विभागाला पूर्ण दिवस सुटी देण्याची गरज नाही. सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी मंत्रालयात उपस्थित राहावे असे आदेश काढल्याने सर्व स्टाफ आज मंत्रालयात उपस्थित आहे. (कार्यालयीन पत्र आणि विभागाच्या व्हाट्सप समूहावरील लिखित सूचनांची प्रत TheNews21 च्या ताब्यात आहे)

फवारणी झालीच तर रसायनाचा वास घेत आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्यालयात बसावे लागेल. कोरोनाची लागण होऊन नाही तर या रसायनामुळे जीव जाईल अशी भीती महसूल विभागाच्या या कर्मचाऱ्यांना वाटते आहे. विभागाचे सचिव डॉ नितीन करीर (Dr Nitin Kareer) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी आणि ५०० कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या अधिकाऱ्याला जाब विचारावा अशी मागणी केली जात आहे. 

Leave a Reply