धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत यशाचे शिल्पकार निव्वळ देवेंद्र फडणवीस

धुळे जि.प. वर भाजपचे निर्विवाद वर्चस्व

नंदुरबारमधून मंत्री पाडवी यांच्या पत्नी पराभूत

मुंबई
धुळे ग्रामीणमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री (CM) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारने केलेली कामे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरीश पटेल (Amrish Patel), शिवाजीराव दहिते (Shivajirao Nahiye) यांना भाजपमध्ये (BJP) आणण्याची व्यूहरचना आणि विद्यमान महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारबद्दल लोकांच्या मनात संशय निर्माण करण्यात यशस्वी झालेले फडणवीस. याचा एकत्रित परिणाम म्हणजे धुळे (Dhule) जिल्हा परिषदेवर (Zilla Parishad) भगवा फडकवण्यात भारतीय जनता पक्षाला (भाजप) (BJP) मिळालेले यश असे या निकालाचे विश्लेषण करता येईल.


धुळ्यातील ज्येष्ठ पत्रकार संतोष मासोळे (Santosh Masole) यांनी सांगितले की, भाजप- शिवसेनेचे सरकार असताना धुळ्यातील ग्रामीण भागात जे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले त्यात अक्कलपाडा प्रकल्प (Akkalpada), सुलवाडे-जामफळ धरण यांचा प्रामुख्याने समावेश होतो. जलयुक्त शिवार योजनेला (JalYukta Shivar) मिळालेले यश. वर्षांनुवर्षे अपूर्ण असलेले धरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी फडणवीस सरकारने प्रचंड निधी दिला. मनमाड-धुळे-इंदूर (Manmad-Dhule-Indor) या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली. यातून लोकांमध्ये विश्वास वाढला. हा रेल्वे प्रकल्प खान्देशाचा (Khandesh) चेहरा-मोहरा बदलणारा प्रकल्प ठरणार आहे. सामान्य जनतेला मागच्या सरकारची ही विकासाची भूमिका आवडली असावी. त्यातच मागच्या सरकारमधील शिवसेनेने (Shiv Sena) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीला (NCP) सोबत घेऊन स्थापन केलेले महाविकास आघाडी सरकार किती काळ टिकेल, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली मोहीम लोकांच्या मनात या सरकारबद्दल संशय निर्माण करण्यास यशस्वी ठरते आहे. म्हणूनच ग्रामीण जनतेने भाजपच्या पारड्यामध्ये आपले मत टाकले असावे, असा दावा संतोष मासोळे यांनी केला.


राजकीय ध्रुवीकरणाचा प्रयोग करताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसमधील मातब्बर नेते अमरीश पटेल, शिवाजीराव दहिते आणि शेवटी शेवटी राजवर्धन कदमबांडे (Rajwardhan Kadambande) यांना भाजपमध्ये आणण्याची खेळी खेळली. ही खेळी चांगलीच यशस्वी झाल्याचे जिल्हा परिषद निकालावरून दिसते आहे.


धुळे ग्रामीण मधून काँग्रेसचे तरुण नेते कुणाल पाटील (Kunal Patil) हे सलग दुसऱ्यांदा आमदार (MLA) झाले आहेत. विधानसभा निवडणुकीआधी कुणाल पाटील देखील भाजप किंवा शिवसेना जातील अशी चर्चा होती . मात्र त्यांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले आणि विधानसभा निवडणूक जिंकले. असे असले तरी कुणाल पाटील आणि त्यांचे पिताश्री ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील (Rohidas Patil) हे कुटुंब सोडले तर जिल्ह्यातून काँग्रेस जवळ्पास हद्दपार झाली आहे. रोहिदास दाजी पाटील यांचे कुटुंब वगळता जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये एकही मोठा नेता राहिला नाही. याचाच परिणाम म्हणून धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला विजय मिळवता आला असावा.


जिल्हा परिषदेचा निकाल बघता निवडून आलेले बहुसंख्य सदस्य हे एकतर शिवाजीराव दहिते पाटील किंवा अमरिश पटेल यांना मानणारे आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या भाजपची सत्ता आली असली तरी हे सर्व सदस्य मूळचे काँग्रेसी आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही.


धुळ्यात रोहिदास पाटील यांचा जवाहर गट आणि पटेल यांचा अँकर गट असे दोन गट अस्तित्वात होते. या निकालाने धुळे ग्रामीण मधून रोहिदास पाटील गटाचे वर्चस्व संपुष्टात आले आहे आणि याचा फटका कॉंग्रेस आमदार आणि त्यांचे आमदार पुत्र कुणाल पाटील यांना पातळ २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बसू शकेल. त्याच वेळी माजी मंत्री भाजपचे जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांचे नेतृत्व या निकालामुळे प्रस्थापित झाले आहे.


नंदुरबार जिल्ह्यातून केसी पाडवी (KC Padvi) यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉंग्रेस महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले आहे. पाडवी हे काँग्रेसचे जुने जाणते आणि कट्टर समर्थक मानले जातात. परंतु नंदुरबारमधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधीच हद्दपार झाली आहे. 


सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी विजयकुमार गावित (Vijay Kumar Gavit) हे राष्ट्रवादीचे मातब्बर नेते भाजपमध्ये दाखल झाले होते आणि त्यांच्यासोबत सगळी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमय झाली होती. गावितांच्या पक्षप्रवेशामुळे नंदुरबारमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा सफाया झाला होता. गावित यांना शह देण्यासाठ काँग्रेसचे चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) एकटेच नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यामध्ये लढत होते. त्यांना के सी पाडवी, पद्माकर वळवी (Padmakar Dalvi) यांचा पाठिंबा मिळत असला तरी पद्माकर वळवी गेल्या दोन निवडणुकीत पराभूत झाले आहेत. राज्य विधानसभा निवडणुकीआधी चंद्रकांत रघुवंशी देखील काँग्रेस सोडून गेले. त्यामुळे जिल्ह्यात केसी पाडवी आणि सुरूपसिंग नाईक (Surupsinh Naik) हे दोनच नेते काँग्रेसमध्ये शिल्लक होते. 
काँग्रेसचे जुने जाणते नेते माणिकराव गावित (Manikrao Gavit) यांच्या कन्या निर्मला गावित (Nirmal Gavit) या याआधीच काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल झाल्या. तर सुरूपसिंग नाईक यांच्या मुलानेही काँग्रेस सोडली आहे. अशा वेळी काँग्रेसला आपला जुना गड राखणे अशक्य होऊन बसले. केसी पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी (Hemlata Padvi) यांचा शिवसेनेच्या उमेदवाराने जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पराभव केला आहे. या निकलातूनच काँग्रेस नंदुरबार मध्ये किती कमकुवत झाली आहे याची प्रचिती येत आहे.


राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं सरकार असलं तरी स्थानिक जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष वेगळा लढला होता. त्याचाच फटका मंत्री पाडवी यांना बसला असावा. एक काळ असा होता की तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी (Indira Gandhi), दिवंगत राजीव गांधी (Rajiv Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) या लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीचा प्रचार नंदुरबार येथून करत असत. नंदुरबारची सभा ही कॉंग्रेसला राज्यात यश संपादन करून देते असे समजले जात असे. आज त्याच नंदुरबार-धुळ्यातून कॉंग्रेस हद्दपार झाली आहे. 

Leave a Reply